विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी फेरपरीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई| सह्याद्री लाइव्ह। महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी २०२२ या परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लगेच पुनर्परीक्षा घ्यावी याबाबत काही विद्यार्थ्यांची, संस्थांची तसेच संघटनांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झालेली आहेत. त्या अनुषंगाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता संबंधित विषयांचे योग्य आकलन होण्याच्या दृष्टीने उपचारात्मक अध्यापन (Remedial Coaching/ Bridge Courses) संस्थास्तरावर घेण्याबाबत सर्व संस्थांना निर्देशित करण्यात येईल.
तसेच, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थातील अंतिम सत्र/वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास्तव उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत अंतिम सत्र/वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता केवळ अनुत्तीर्ण असलेल्या विषयांकरीता एक विशेष बाब म्हणून सप्टेंबर २०२२ या महिन्याच्या तिसऱ्या /चौथ्या आठवड्यापासून प्रचलित (Offline) पध्दतीने फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.
राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परिक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या स्वायत्त मंडळाव्दारे आयोजित केल्या जातात. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२०, हिवाळी परीक्षा २०२०. उन्हाळी परीक्षा २०२१ व हिवाळी परीक्षा २०२१ या चार परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या होत्या. तद्नंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित (Offline) पध्दतीने घेण्यात आली व त्याचा निकाल २९ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.
अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने विशेष बाब म्हणून विद्यार्थ्याकरीता एक अधिकची संधी देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी निवदनाद्वारे सांगितले.