राजगुरुनगर नगरपरिषदेत नऊ ऐवजी आता १० प्रभाग; सात क्रमांकाचा प्रभाग तीन सदस्यीय असल्याने ठरणार ‘गेमचेंजर’
निवडणूक रणधुमाळी : नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर
खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (दि. १०) प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता शहरात निवडणुकीचे रंग भरू लागले असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेची १५ मे २०२० रोजी मुदत संपली. त्यानंतर नगरपरिषदेत खेडचे उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०२० ते मार्च २०२२ या कालावधीतील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपत आलेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका द्विसदस्यीय रचना केली आहे. त्यानुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आता राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या काही कालावधीत होणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेत यापूर्वी नऊ प्रभाग होते. त्यामध्ये आता आणखी एका प्रभागाची भर पडली आहे. त्याशिवाय प्रभाग क्रमांक सात मध्ये तीन जागा आहेत. त्यामुळे आता २१ सदस्य आणि २ स्वीकृत सदस्य अशी सदस्य संख्या असेन, असे नगरपरिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एकूण दोन सदस्यांसाठी राखीव जागा असून, एससीचे व एसटीचे प्रत्येकी एक आरक्षण असणार आहे. एकूण २१ पैकी ११ जागा महिला राखीव असणार आहेत, उर्वरित १० जागांवर आहेत.
आता इच्छुकांची संख्या वाढली असून, नातलग, सगेसोयरे, मित्रपरिवार यांच्याकडे हेलपाटे सुरू झाले आहेत. यंदा राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगत येणार असून, इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जुन्या नगरसेवकांना लोक नाकारता का नवीन तरुणांना संधी मिळते, हे पुढील काळात लवकरच स्पष्ट होणार आहेत.
नगरपरिषदेवर २१ पैकी ११ जागा महिला राखीव
राजगुरुनगर नगरपरिषदेवर महिलाराज येणार आहे. २१ पैकी ११ महिला सदस्या तसेच मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता अभियंता, कर निरीक्षक, भांडार विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभागप्रमुख, प्रधानमंत्री घरकुल विभागप्रमुख, विद्युत पुरवठा विभागप्रमुख व संगणक अभियंता देखील महिलाच आहेत. ही प्रभागरचना www.mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही प्रभागरचना २०११ च्या जनगणनेनुसार तयार केली आहे. एकूण मतदारसंख्या २८ हजार ५९२ आहे. यापैकी अनुसूचित जमातीचे १७६९, तर अनुसूचित जातीचे १४२५ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ७ ‘गेम चेंजर’ असून, त्यामधून ३ नगरसदस्य निवडून जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रभाग रचनेबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी २ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करणे, याला जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता घेणे, १० मार्चला प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे नागरिकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व नगरपरिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे, १० ते १७ मार्चपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. २५ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी हरकती व सूचनांवर अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवतील. पाच एप्रिलपर्यंत नगरपरिषदेच्या अंतिम प्रभागरचना कार्यक्रम जाहीर होणार आहे.
– विकास वाघमारे, लेखापाल तथा हरकत नोंदणी कक्षप्रमुख, राजगुरुनगर नगरपरिषद