राजगुरूनगर असुविधांच्या गर्तेत
नगरपरिषदेचे कामकाज विस्कळीत : नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर नगरपरिषदेचे अंतर्गत काम विस्कळीत झालेले आहे. लोकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत, नागरिकांना वेठीस धरले जाते. माजी नगरसेवक कामात त्यांच्या सोयीने हस्तक्षेप करतात. सर्वसामान्य लोकांना येथे न्याय मिळत नाही. शहरात अनेक रस्ते खोदले आहेत अर्धवट कामे झाली आहेत ती तात्काळ पूर्ण करावीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
राजगुरूनगरमधील पाणी, वीज, आरोग्य व घनकचरा आदी असुविधांबाबत, नगरपरिषद अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व राजगुरूनगरकर यांची बुधवारी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यासोबत बैठक झाली, त्यावेळी नागरिकांनी समस्यांच पाढाच वाचला. यावेळी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस,
माजी सरपंच शांताराम घुमटकर, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी जिप सदस्य बाबा राक्षे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रताप आहेर, किरण आहेर, गणेश थिगळे, नगरसेवक ऍड. सुरेश कौदरे, रेवणनाथ थिगळे, बाळासाहेब सांडभोर, महेंद्र मधवे, गिरीश चावरे, निलेश संभूस, नितीन सैद यांच्यासह ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषदेत घर, फ्लॅट नोंदी घालताना प्रचंड प्रमाणात पैसे घेतले जातात. त्यासाठी एजंट नेमले आहेत, पैसे दिल्यास कामे होतात असा आरोप गणेश थिगळे यांनी केला. राजगुरूनगरमध्ये तोंडाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागतो, एवढी कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. खरेतर कचरा उचलण्याच्या कामात आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील झालेल्या भ्रष्टाचाराची ही दुर्गंधी आहे, असे विजय डोळस यांनी आरोप करीत दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली. दशक्रिया घाट आणि अंत्यविधी परिसराच्या समस्या दूर कराव्यात, कचऱ्याची व्यवस्था लावावी, आरोग्य केंद्रासाठी चांगली इमारत बांधावी, रस्ते सुधारावेत आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
आरोग्यसेवा मिळत नाही
राजगुरूनगर शहरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. सर्व सामान्य रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असल्याने सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी किरण आहेर व सुरेश कौदरे यांनी केली.
प्रकल्प “त्या’ ठिकाणी नको
राजगुरूनगर शहरात 38 कोटीं खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्याच जागेत नियोजित आहे. सिद्धेश्वर हे गावचे प्राचीन देवस्थान व श्रद्धास्थान आहे. तिथे हा दुर्गंध पसरविणारा व पावित्र्य भंग करणारा प्रकल्प होऊ नये, अशी मागणी अतुल देशमुख, कैलास सांडभोर, विजय डोळस, शांताराम घुमटकर आदींनी केली.
त्यासाठी समिती करा
राजगुरूनगर शहराच्या सध्याच्या अंत्यविधीच्या ठिकाणी विद्युतदाहिनी व गॅसदाहिनी उभारावी. दशक्रिया घाट परिसराचा विकास करावा व त्यासाठी राजगुरूनगर ग्रामस्थ व 24 वाड्यांच्या प्रतिनिधींची समिती कराव, अशी या बैठकीत मागणी करण्यात आली.
भुयारी गटार योजनेबाबत गावातील लोकांनी सुचविल्याप्रमाणे नगरपरिषद शासनाला पर्यायी जागेसाठी प्रस्ताव देईल. त्यापुढे शासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल. पिण्याच्या पाणीयोजनेसाठी एक्सप्रेस फिडरसाठीची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर मंजुरीसाठी आहे. फिडरचे काम झाले की, योजना कार्यान्वित होईल.
– निवेदिता घारगे, मुख्याधिकारी
राजगुरूनगर : शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेत बैठक घेण्यात आली.