गुन्ह्यातील हत्यार, कपडे तसेच जखमीचा जबाब नसतानाही सात वर्षे शिक्षा
शिरूर : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील जखमीचा जबाब तसेच आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे तसेच हत्यार नसतानाही न्यायालयाने एकास सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुभाष पांडुरंग कड (वय 33, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर, सध्या रा. साबळेवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी कामकाज पाहिले. पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने तपास झाला असल्याने खटल्यादरम्यान, त्यांनी न्यायालयास अर्ज देऊन जखमी व्यक्तीला न्यायालयात बोलावून घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर न्यायालयात त्याची साक्ष नोंदविण्यात आली. संबंधित व्यक्ती घटनेनंतर 22 दिवस रुग्णालयात होता.
रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांनी फक्त जखमी प्रमाणपत्र घेतले. खटला सुरू होईपर्यंत संबंधित व्यक्तीचा जबाब न्यायालयापुढे आला नाही. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास व्यवस्थित केला नाही. त्यांनी जखमी व्यक्तीचा जबाब नोंदविला नाही.
तसेच, गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व आरोपीने घटनेवेळी घातलेले कपडे जप्त केले नाही. पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने तपास होत असेल तर त्याचा फायदा आरोपींना होईल. यास्वरुपाच्या घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणात लक्ष घालून समोर आलेल्या पुराव्यांआधारे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.
जखमी व्यक्तीचा जबाब का नोंदविण्यात आला नाही यावर तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयापुढे कोणतेही कारण सांगता आले नाही. हत्यार जप्त का केले नाही याचेही कारण पोलिसांना सांगता आले नाही. न्यायालयाने जखमी व्यक्तीची साक्ष व ॲड. कावेडिया यांची मागणी मंजूर करत आरोपीला भारतीय दंड विधान कलम 307 नुसार 7 वर्षे व भारतीय दंड विधान कलम 324 नुसार 2 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. 12 मे 2012 रोजी शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथे हा प्रकार घडला. शंकर दत्तात्रय दरेकर असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी, सागर शिवाजी दरेकर (वय 20, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दरेकर यांनी कड यास आपली बहिण कोठे असल्याची विचारणा केली. याकारणावरून कड याने चाकूने व त्याच्या साथीदाराने काठ्याने मारहाण केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणात तिघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.