पुणे : जिल्ह्यात एकूण 1 लाख 83 हजार 763 जणांचे लसीकरण्यात
ग्रामीणमध्ये दिवसभरात तब्बल एक लाख तर जिल्ह्यात पावणेदोन लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
पुणे – जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेकडून मंगळवारी (दि. 7) “विशेष लसीकरण मोहीम’ राबविण्यात आली. त्यामध्ये दिवसभरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तब्बल 1 लाख 894 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. आतापर्यंतची सर्वाधिक लसीकरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 83 हजार 763 जणांचे लसीकरण्यात करण्यात आले.
मागील दोन आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोमवारी (दि. 6) दिवसभरात कोविशिल्डचे 3 लाख 8 हजार 90 तर कोवॅक्सिनचे 19 हजार 310 डोस मिळाले. त्यामध्ये ग्रामीणसाठी सर्वाधिक 1 लाख 58 हजार 950 कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले. त्यानंतर तात्काळ पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 13 तालुके, कॅन्टोन्मेंट परिसरातील लसीकरण केंद्रावर लस वितरीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सर्व तालुक्यातील लसीकरण केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात आली.
त्यामध्ये 224 केंद्रावर मिळून तब्बल 1 लाख 894 लाभार्थ्यांना आज लस देण्यात आली. त्यामध्ये करंजविहरे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक 3 हजार 107 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. त्यानंतर शेळपिंपळगाव, बेलसर, पेरणे, तळेगाव दाभाडे, माळशिरस, परिंचे, नसरापूर, पळसदेव, खामगाव, रहू, रांजणगाव, खडकाळा, केंदूर या केंद्रांवर एक हजाराच्या पुढे लसीकरण झाले आहे. निरा, येळसे, पिंपळवंडी, वारूळवाडी, सावरगाव, भिगवण, मोरगाव, लोणीकाळभोर, लोणावळा, वाघोली, बेल्हा, बावडा, जेजुरी, राजुरी, इंदापूर येथील निरावांगी, कार्ला यासह काही केंद्रांमध्ये पाचशेहून अधिक लसीकरण झाले. ग्रामीणमध्ये याअधी बजाज कंपनीच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक दीड लाख लसीकरण झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा लसीकरणाची सर्वाधिक संख्या नोंदविण्यात आली आहे.
मनुष्यबळ कमी असतानाही प्राथमिक आरोग्य आणि लसीकरण केंद्रावरील परिचारिका, डाटा येन्ट्री ऑपरेटर यांनी एक लाख लसीकरण करण्यात मोठा वाटा आहे. तर आशा स्वयंसेविका यांनी घरोघरी जावून सर्व माहिती गोळा करून लसीकरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे आज एक लाखाचे उद्दीष्ट पार करू शकलो. नर्स आणि आशा वर्कर यांचे आभार मानतो, यापुढेही लसीकरणाची गती राहण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
– आयुष प्रसाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे
दिवसभरात तालुकानिहाय झालेले लसीकरण
बारामती – 12,538, खेड – 11,380, जुन्नर – 11,108, मावळ – 10,004, दौंड – 9,988, शिरूर – 9,577, पुरंदर – 8,630, इंदापूर – 6,741, हवेली – 6,589, आंबेगाव – 4,241, मुळशी – 3,664, भोर – 3,650, कॅन्टोन्मेंट – 2,299, औंध जिल्हा रूग्णालय – 319, वेल्हा – 166