तीर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या; आवश्यक निधी मिळवून देऊ – पालकमंत्री यशोमती ठाकूर
अमरावती : तीर्थक्षेत्र व महत्त्वाच्या स्थळांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून विविध सुविधांच्या उभारणीतून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थस्थळी आवश्यक कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झूम प्रणालीद्वारे झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेन्द्र भुयार, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील क्षेत्र रिध्दपूर, क्षेत्र कपिलेश्वर देवस्थान उर्फ महादेव संस्थान, गव्हाणकुंड, क्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान, अंबाडा, क्षेत्र यशवंत महाराज संस्थान, मुसळखेड ता.वरुड, जहागीरपुर ता.तिवसा या तीर्थक्षेत्र स्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या की, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मोझरी व कौंडण्यपूर विकास आराखड्यात अनेक महत्त्वपूर्ण कामे व सुविधांचे नियोजन करण्यात येऊन, अनेक कामांची पूर्तताही झाली आहे. त्याचप्रमाणे, इतर तीर्थक्षेत्र स्थळांवरही विविध सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव द्यावेत.
विहित मुदतीत ही कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यानुसार गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.