सीईटीपी प्लांट आधुनिकीकरणासाठीच्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना
कोल्हापूर दि. 17 (जिमाका) : पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपी प्लँटच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
इचलकरंजीतील पंचगंगा प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने सीईटीपी प्लँट (औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा) आधुनिकीकरणाबाबत आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, इचलकरंजीचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अधिकारी रवींद्र आंधळे, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, सीईटीपीचे चेअरमन संदीप मोघे, संचालक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपी प्लँटच्या अधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची माहिती लवकरात लवकर घ्यावी. सीईटीपीला लागून असणाऱ्या काळ्या ओढ्या लगतच्या जागेची पाहणी करा व याबाबतचा प्रस्ताव तात्काळ तयार करुन नगररचना विभागाकडे सादर करावा, जेणेकरुन या प्लँटच्या आधुनिकीकरणाचे काम जलदगतीने सुरु होईल.
यावेळी इचलकरंजीचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व सीईटीपीचे चेअरमन संदीप मोघे यांनी याविषयी माहिती दिली.