वैंनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तातडीने सादर करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
नागपूर : वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणांनी लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, उपायुक्त (गोसीखुर्द) आशा पठाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांच्यासह नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जलसंपदा विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नाग, पिवळी, कन्हान व वैनगंगा नदी प्रदूषणविषयक माहितीचे सादरीकरण केले.नागपूर महापालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सांडपाणी नाग, पिवळी व कन्हान नदीत सोडण्यात येते. या नद्यांमधील दूषित पाणी तसेच भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेचे सांडपाणीही वैनगंगा नदीमध्ये येत असल्याने वैनगंगा नदीतील पाणी दुषित होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय यंत्रणांनी नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठीच्या लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचे कृती आराखडे तातडीने सादर करावेत, असे लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा आढावा घेण्यात आला असून लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबतच्या उपाययोजनांविषयीची माहिती जिल्हाधिकारी कदम यांनी दिली. तसेच नागपूर महापालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रियेची सद्यस्थिती तसेच प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिली