महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माध्यमातून राज्यशासनाच्या सकारात्मक कामांना चालना
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्थापनेपासून 55 वर्षानंतर एका सामान्य परिवारातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला म्हणजेच डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पद सांभाळण्याची संधी मिळाली. या निवडीचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाते. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विद्वतापूर्ण, अभ्यासू, संयमशील आणि एका विशिष्ट वैचारिक उंची असलेल्या भाषणांनी सामाजिक प्रश्नांची बाजू त्यांनी गेली 20 वर्ष मांडली आहे. आज त्यांच्या विधानपरिषद उपसभापती पदाच्या कारकीर्दीला 24जून 2022 रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांनी या काळात केलेल्या विविधांगी कामांचा आणि त्यांच्या अनेक विषयांवरील बैठकांच्या माध्यमातून सकारात्मक रीतीने झालेल्या अंमलबजावणीचा हा धावता आढावा.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीन वर्षांत महिला अत्याचार, उसतोड कामगार, गिरणी कामगार, शेतकरी महिला, शेतमजूर, राज्यातील विविध देवस्थाने, यावर काम केले. बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात गर्भाशय टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात तपासणी करण्याबाबत त्यांचे काम लक्षणीय आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि आदिवासी भागातही ही योजना लागू करण्याबाबतही त्यांनी आढावा घेतला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांच्या नावे जमीन व्हावी व त्यांना मदत देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली, महसूल विभागासोबत आकारी पड जमिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विवाह नोंदणी व पती पत्नी दोघांच्या नावे जमीन होण्यास मोहिमांचीही शिफारसत्यांनी आरोग्य व महसूल विभागास केली. महाराष्ट्रातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा या विषयावरील बैठक, महिलांना सार्वजनिक ठिकाणे-शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी बैठका घेतल्या.
पंढरपूर, शिर्डी, लेण्याद्री, कार्ला येथील एकविरा मंदिर आदी ठिकाणी भाविकांसाठी पायाभूतसुविधांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून तेथील विकास कामांना गती मिळाली. भटके, विमुक्त आणि उसतोड कामगारांबाबत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना ओळखपत्र देण्यासंदर्भात, कल्याणच्या नाट्यगृहात सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत, राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विविधविषयांवर चर्चा करुन कोविड परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या व उपाययोजना आदीविषयांवरही त्यांनी अविरत काम केले. कोविड काळानंतर शाळा सुरु करताना घ्यावयाचीकाळजी आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षणाबाबत व इतर विषयावर त्यांनी पुढाकार घेतला.
शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबाबत केंद्र सरकारने केलेला कृती कार्यक्रम या आणि अशा अनेक विषयांवर राज्य सरकारसोबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला आहे. उपसभापती कार्यालयाकडून याचा एक अहवाल लवकरच प्रकाशित होणार आहे.