खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक । सह्याद्री लाइव्ह । केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक्स्पोच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या स्वप्नातलं घर मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित गृह प्रदर्शन शेल्टर 2022 चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फरदे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, कृणाल पाटील, गौरव ठक्कर महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, ललित रूंगठा आदी मान्यवर व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काच घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रसेर असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या उद्योग व्यवसायांमुळे घरांच्या मागणीत वाढ
समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी विविध संस्थांना भूखंडासाठी भाडे आकारणीचा नियम बदलल्याने या संस्थांना आर्थिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र भाडे आकारण्यात यावे, यासाठी नियमात सुधारणा करण्याकरिता निर्देश देण्यात आले आहे. तसेच मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिककडे विकसीत शहर म्हणून पाहिले जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मंत्र नगरी ते यंत्र नगरी असा प्रवास केलेल्या नाशिकची विकसनशील उद्योगनगरी म्हणून ओळख आहे.ज्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायांचा विस्तार वाढतो तिथे घरांची मागणी वाढते आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन प्रयत्नशील
नाशिक पर्यटन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विस्तारत आहे. त्यामुळे सुनियोजित विकासाची संधी नाशिकला आहे. नाशिकला वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा उच्च शिक्षणासाठीचे सर्व प्रकारचे कॉलेजेस वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच नाशिककडे लोकांचा ओढा वाढतोय. नाशिक शहर व परिसरातील धरणांमुळे शेतीसाठी पाणी मुबलक असल्याने ॲग्रो इंडस्ट्रीही जोमाने उभी राहत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने नाशिक शहर मध्यवर्ती असून शहरातील पायाभूत सुविधा दर्जेदार आहेत. पुणे- नाशिक अतिजलद रेल्वेचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्र हे रोजगार निर्मिती करणारं दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
नाशिकचा विकास करताना क्रेडाईचाही सहभाग घेतला जाईल – पालकमंत्री दादाजी भुसे
गृह प्रदर्शन शेल्टर 2022 ने नाशिकच्या नावलौकिकात भर टाकली आहे. कारण शेल्टर हा उपक्रम नाशिकपुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला आहे. नाशिक शहराचा विकासाबाबत निर्णय घेत असताना क्रेडाईलाही सहभागी करून घेण्यात येईल. जेणेकरून क्रेडाईच्या सदस्यांच्या अभ्यासाचा व अनुभवाचा नाशिकला फायदा होईल. येणाऱ्या कुंभमेळ्यात केंद्र सरकार व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून नाशिकच्या विकासाची कामे केले जातील. तसेच सर्वांच्या सहकार्याने नाशिकचा सर्वांगीण विकास करण्यात येईल,अशी ग्वाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.
जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
यावेळी खासदार हेमंत गोडसे व महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून गृहप्रदर्शन शेल्टर 2022 ला शुभेच्छा दिल्या.