उन्हातल्या उत्साहाची ही सावली जपून ठेवा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
• महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शानदार उद्घाटन • पथसंचलनाचे प्रभावी सादरीकरण
नांदेड : महसूल विभागाला प्रशासकीय पातळीवरील अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी पार पाडावी लागते. तीनशे पेक्षा अधिक समित्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. वेळेवर येणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या. 24 तास बांधिलकी पत्करून काम करतांना महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसारखे ऊर्जा देणारे उपक्रम आवश्यक असतात. नांदेडच्या उन्हात या स्पर्धा म्हणजे उत्साहाची सावली असून आयुष्यभर पुरणारी ती ऊर्जा आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2022 चे आज शानदार उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नांदेड येथील गुरु गोविदसिंघजी स्टेडियम येथे झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर आमदार अमर राजूरकर, महापौर जयताई पावडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, परभणीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जालनाचे जिल्हाधिकारी विजय राठोड, बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, मीनल खतगावकर, नागेलीकर यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष, तलाठी संघटनेचे अध्यक्ष तसेच आठही जिल्ह्याचे महसुल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
राज्यात उष्णतेचा पारा 44 अंशाच्या पुढे सरकलाय. अशा वातावरणात ते ही नांदेडमध्ये महसूल क्रीडा स्पर्धा घ्यायची आयोजन पूर्ण तयारी करतात आणि यात मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात हे या स्पर्धेचे यश असल्याचे सांगून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे कौतूक केले.
नांदेड जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आणि या सेवा-सुविधा चांगल्या पध्दतीने सुस्थितीत कशा ठेवल्या जाव्यात याचे यशस्वी उदाहरण म्हणून नांदेडकडे पहावे लागेल. येवढ्या उष्णतेतही स्टेडियम मधील लॉनच्या हिरवळीपासून ते इतर व्यवस्थेपर्यत कोणतीही कमतरता इथे दिसत नाही. नांदेडमध्ये क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी आणखी भव्य क्रीडा संकूल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी” या शब्दात त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करुन नांदेड जिल्ह्यातील विकास कामांबाबत कौतुक केले.
महसूल मंत्री जेव्हा मुलीचा गौरव करताना वडिलांची प्रचिती देतात !
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळयात स्वागत करतांना नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे प्रमुख पाहुण्यांना आवर्जून लेकीच्या नावाची पाटी देण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या माझी मुलगी माझा अभिमान या अभियानाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रत्येकांच्या ट्रॅक सूटवर त्यांच्या मुलीचे नाव आवर्जून त्यांच्या पाठीमागे लिहले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या प्रास्ताविकातही अभिमानाने उल्लेख केला होता. तो धागा पकडत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मलाही तीन लेकी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या तिघीही त्यांच्या क्षेत्रात स्वत: च्या गुणवत्तेने आपले नेत्वृत्व सिध्द करून आप-आपल्या क्षेत्रात अपूर्व ठसा उमटून आहेत, असे सांगितले. त्यांनी वडिलांच्या भूमिकेत स्वत:ला घेत लेकी प्रती असलेल्या भावूकतेचा प्रत्यय दिला.
आव्हानांना पेलवून दाखविणे ही महसूल यंत्रणेची खरी ताकद – पालकमंत्री अशोक चव्हाण
कोरोनाच्या काळात तहान-भूक विसरुन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी तत्पर राहिली यात महसूल यंत्रणेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अतिवृष्टी पासून ते पूरापर्यत, कोविड सारख्या आपत्तीपासून ते विविध आव्हानापर्यंत सातत्याने स्वत: सिध्द करुन आपली महसूल यंत्रणा उभी आहे. आव्हानात्मक काळातही गुणवत्तापूर्ण कामे करुन दाखविणे ही महसूल यंत्रणेची खरी खासियत, ताकद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले. कामाचे स्वरुप लक्षात घेता महसूल विभागाला कामे संपता-संपत नाहीत अशा स्थितीत स्वत:च्या छंदासाठी वेळ काढणे, त्यात आवडत्या खेळाचा सराव करणे, कुटूंबाला वेळ देणे ही तारेवरची कसरत आहे. ही सर्व कसरत सांभाळून नांदेड जिल्हा प्रशासन या स्पर्धेतही आपली चुणूक दाखवून हा उपक्रम यशस्वी करुन दाखवतील असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
निष्ठा हीच खरी ताकद – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
या स्पर्धेची सुरुवात उत्कृष्ट अशा परेडच्या संचलनापासून झाली आहे. ते एक सामुहिक शिस्तीचे प्रतिक आहे. एखाद्या सैन्य दलाप्रमाणे महसूल विभाग कोणत्याही आव्हानात न डगमगता काम करतो. आता या कार्यशैली समवेत उत्कृष्ट सामुहिक पथसंचलन करु शकतो. याचा प्रत्यय महसूल विभागातील सर्व संघाने दिला, असे गौरवोद्गागार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी काढले.
आव्हानात्मक कामे करतांना आपली निष्ठाही पणाला लागत असते. निष्ठापूर्वक कामे करुनही कुणाच्या तक्रारी असतील तर त्यासाठी तत्परता ठेवावी लागते, असे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्पष्ट केले. स्पर्धा या अपयश पचविण्याची ताकद देतात तसेच विजयी झाल्यावर संयमाचे भान देतात याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी आमदार अमर राजूरकर यांनी आपल्या मनोगतात दांगट समितीच्या अहवालाकडे महसूलमंत्र्याचे लक्ष वेधले. मराठवाडा हा विनाअट सामिल झाला असून प्रशासकीय सोईच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाची विभागणी यावर त्यांनी भाष्य केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली. तीन दिवशीय या स्पर्धेत एकुण 82 स्पर्धा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमात तलाठी संघटनेचे अध्यक्ष . सूर्यवंशी, विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवाड, तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे यांनी केले तर आभार नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी मानले.