श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावण यात्राव्यवस्थापनासाठी प्रशासनाची तयारी सुरू
प्रशासकीय अधिका-यांनी केला पाहणी दौरा
भीमाशंकर । सह्याद्री लाइव्ह । बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी अधिक श्रावण आणि श्रावण महिना जोडून आल्यामुळे सात श्रावणी सोमवार असणार आहेत. दरम्यान सुट्ट्यांचे दिवसही असल्यामुळे यावर्षी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
१८ जुलै ते १६ सप्टेंबर दरम्यान श्रावण यात्रेसाठी भीमाशंकरला येणा-या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रामुख्याने प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी जुन्नर-आंबेगाव प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, खेड प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्यासह अधिका-यांनी मंदिराजवळील वाहनतळ आणि मंदिर परिसराची पाहणी केली.
श्रावण यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व विभागांना दिलेल्या जबाबदा-यांचे काटेकोर पालन व्हावे अशा सुचना जुन्नर-आंबेगाव प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिल्या आहेत.