आनंद सोहळ्याची तयारी
पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. जे जाऊ शकत नाही त्याची भावना संत नामदेवांनी ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥’ अशा शब्दात वर्णिली आहे.
असा हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक येतात. विठूनामाचा गजर करीत एकरूप होतात. तहान-भूक विसरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यांना वारीचा आनंद लुटता यावा आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी ते मार्गस्थ व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.
पुणे जिल्ह्यात दोन प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत, देहू आणि आळंदी. देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करते. यावर्षी या दोन्ही पालखी सोहळ्याला अनुक्रमे 20 आणि 21 जून रोजी प्रारंभ होणार आहे. तसेच सासवड येथून संत सोपानकाका आणि चांगावटेश्वरचा पालखी सोहळादेखील 25 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
पालखी सोहळ्याचा मार्ग साधारणत: जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या पाच तालुक्यातून जात असल्याने या भागावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागातील भाविकदेखील जिल्ह्यातून प्रवास करणार असल्याने त्यांनाही कोणतीही अडचण येऊ नये याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा सोहळा होत आहे. वारीत सहभागी होण्यासाठी भाविक उत्सुक असतात, आणि म्हणूनच यावर्षी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात येऊन नियोजनाची रुपरेषा तयार करण्यात आली. सोबतच पालखी मुक्काम, पालखीतळ आणि विसाव्याच्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक सुविधेबाबत माहिती घेण्यात आली आणि त्यानुसार नियोजनाला अंतिम रुप देण्यात आले.