जागतिक ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाद्वारे महावितरणकडून प्रबोधन
पुणे : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून स्वारगेट बसस्थानकामध्ये मंगळवारी (दि. १५) प्रदर्शनीच्या माध्यमातून महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी विविध योजनांसह महावितरणची ग्राहकसेवा, वीजसुरक्षा, वीजबचतीबाबत माहितीपत्रके वितरीत करण्यात आले.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त स्वारगेट बसस्थानकामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांसाठी असलेल्या ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०’, थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या अकृषक वीजग्राहकांसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’, महावितरणचे मोबाईल अॅप, ऑनलाइन वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणीसह वीजबिलांच्या नावामध्ये बदल, पर्यावरणपूरक गो-ग्रीन योजना आदींसह वीजसुरक्षेचे महत्व व खबरदारी, वीजबचतीचे उपाय आदींबाबत प्रदर्शनीला भेट दिलेल्या वीजग्राहकांना माहिती देण्यात आली. तसेच संबंधीत माहितीचे पत्रकेही वितरीत करण्यात आले.
महावितरणच्या प्रदर्शनीला अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले आदींनी भेट दिली. यासोबतच महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी देखील प्रदर्शनीला भेट देत वीजग्राहकांशी संवाद साधला.
दिवसभराच्या या प्रदर्शनीमध्ये ग्राहक सुविधा केंद्रांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे व राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व ग्राहक सुविधा केद्रांतील कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या ग्राहकसेवेची माहिती दिली. या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी कार्यकारी अभियंता सर्वश्री अनिल गेडाम, भागवत थेटे, अमित कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.