जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असला तरी लवकरच वीजपुरवठा सुरु करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली. पथदिव्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय सावकारे, प्रशांत बंब, रवींद्र वायकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
मुश्रीफ म्हणाले की, सार्वजनिक पाणीपुरवठा पथदिवे ग्राहकांच्या थकीज वीज देयकाबाबत 16 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार 21 मार्च 2018 पूर्वी जे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत, त्या पथदिव्यांची पुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे शासन अनुदान किंवा वित्त आयोग अनुदानातून भरणा करावी अशी तरतूद आहे.
31 मार्च 2018 नंतर अस्थापित झालेल्या पथदिव्याच्या वीज देयकाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीकडून महावितरण कंपनीस अदा करण्यात यावी अशी तरतूद असताना वीज कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला होता. मात्र आता महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. भविष्यात अशी अडचण येऊ नये यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास विभाग आणि ऊर्जा विभाग समन्वयाने काम करेल.
00