बटाटा, मिरची महागली; टोमॅटो स्वस्त, उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर
पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने बटाटा, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. केवळ टोमॅटोच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी (दि. 9) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यातून मध्य प्रदेश येथून 25 ते 28 ट्रक मटार, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश येथून 8 ते 10 ट्रक हिरवी मिरची, राजस्थान येथून 10 ते 12 ट्रक गाजर, उत्तर प्रदेश येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 2 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1200 ते 1300 पोती, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट्स, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 100 ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा 30 ते 32 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 200-320, बटाटा : 120-160, लसूण :200-400, आले सातारी : 100-170, भेंडी : 500-700, गवार : गावरान व सुरती 500-700, टोमॅटो : 150-200, दोडका : 400-500, हिरवी मिरची : 400-600, दुधी भोपळा : 150-250, चवळी :
400-500, काकडी : 200-300, कारली : हिरवी 400-500, पांढरी : 350-400, पापडी : 400-450, पडवळ : 250-300, फ्लॉवर : 100-150, कोबी : 150-220, वांगी : 600-800, डिंगरी : 350-400, नवलकोल : 150-200, ढोबळी मिरची : 500-700, तोंडली : कळी 400-450, जाड : 200-220, शेवगा : 1200, गाजर : 150-200, वालवर : 400-450, बीट : 220-250, घेवडा : 300-400, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 350-400, ढेमसे : 350-400, भुईमूग शेंग : 400-450, मटार : 250-280, पावटा : 500-600, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.