गवताळ प्रदेशातील “पोल्टी वेस्ट’ ठरतोय लांडग्यांसाठी जीवघेणा
विषबाधेमुळे लांडग्यांचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण जनजागृतीसाठी होताहेत संयुक्त प्रयत्न
पुणे : भारतीय लांडग्याच्या सर्वात प्राचीन वंश असलेल्या लांडग्यांचा पुण्याजवळील सासवड येथील गवताळ प्रदेशात वास्तव्य आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाणारी ही प्रजाती “पोल्ट्री वेस्ट’मुळे होणाऱ्या विषबाधेचा शिकार बनत आहे. गैरसमजातून अथवा अनावधाने होणारा हा प्रकार रोखण्यासाठी स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांतर्फे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत.
सासवड येथील गवताळ प्रदेश, माळरानावर स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांकडून त्यांच्याकडील मृत कोंबड्या, बकऱ्या अथवा त्यांचे अवशेष फेकून दिले जातात. अनेकदा यावर रासायनांची फवारणीही केली जाते. याठिकाणी असलेले लांडगे या मृत कोंबड्या, बकऱ्या खातात. मात्र, त्यावर फवारलेल्या रसायनांमुळे विषबाधा झाल्याने या लांडग्यांचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण पुण्यातील द ग्रासलॅंड ट्रस्ट आणि वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.
याबाबत ट्रस्टचे मिहीर गोडबोले म्हणाले की, सासवड येथील गवताळ प्रदेशात असलेल्या लांडग्यांच्या संवर्धनासाठी ग्रासलॅण्ड गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी काही लांडग्यांचा विषबाधेने मृत्यू होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. मात्र, त्याची पडताळणी करणे गरजेचे होते. त्यानुसार, आम्ही काही मृत शवांचे नमुने विषशास्त्र चाचणीसाठी पाठवले यापैकी काही नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचा अंश असल्याचे आढळले. त्यामुळे या भागात लांडग्यांचा मृत्यू विषबाधेने होत असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार वनविभाग, जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने या परिसरातील नागरिकामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविला जात असून, स्थानिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
…असा झाला अभ्यास
ग्रासलॅन्ड ट्रस्ट आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे जलद कृती प्रकल्पांतर्गत पोल्ट्री वेस्ट टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांची नोंद घेण्यात आली. त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. या ठिकाणांवरून यादृच्छिकपणे शव गोळा केले गेले आणि विषशास्त्र चाचणीसाठी पाठविण्यात आले.
…अशा आहेत रसायना वापराच्या शक्यता
- मृत कोंबडी, बकरी फेकताना, लवकर विघटन व्हावे, यासाठी केली जाणारी फवारणी
- मृत अवशेषांची दुर्गंधी पसरू नये, यासाठी रसायनांचा वापर
- कोंबड्या खाण्यासाठी येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करणाऱ्यासाठी रसायनांचा वापर
- लांडग्यांच्या शिकारीसाठी काही जणांकडून मुद्दामहून प्रयोग केला जाऊ शकतो
- ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झालेल्या कोंबड्यांपासूनचा संसर्ग रोखण्यासाठी रसायनांचा वापर