पोलीस हवालदार अजय दरेकर यांची निगडी-कन्याकुमारी सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण
नऊ दिवसांत त्यांनी 91 तास 42 मिनिटे सायकलिंग करून 1600 किलोमीटर लांबीचा पल्ला पार केला
कामशेत : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याचे औचित्य साधून, इंडो ऍथलेटिक सोसायटीचे 75 सदस्य पुणे ते कन्याकुमारी हे 1600 किमीचे मोठे अंतर कापण्यासाठी सायकलस्वारीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने सहभागी असलेली ही आपल्या देशातील एकमेव सर्वात लांब “राइड’ ठरली. कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजय दरेकर यांनी वयाच्या 48 व्या वर्षी यशस्वीरित्या सायकलवारी पूर्ण केली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र दलाच्या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी प्रशिक्षण भागीदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिमान असल्याचे पोलीस हवालदार अजय दरेकर यांनी सांगितले.
दहा दिवसांच्या प्रवासात पुणे-कराड-बेळगाव-येल्लापूर-मुरुडेश्वर-मंगळूर-थलासेरी-गुरुवायूर-अलप्पुझा-तिरुवनंतपुरम-कन्याकुमारी अशी ठिकाणे समाविष्ट होती. सर्व रायडर्स यांनी दररोज 9 ते 10 तास सायकल चालवून 170-180 किमी अंतर पार केले जात होते, असे नऊ दिवसांत त्यांनी 91 तास 42 मिनिटे सायकलिंग करून 1600 किलोमीटर लांबीचा पल्ला पार केला.
पोलीस हवालदार अजय दरेकर हे पोलीस खात्यात कार्यरत असल्याने कामामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. आणि यामुळे त्यांना डायबिटीजचा त्रास जाणवायला लागल्यामुळे त्यांनी अडीच वर्षांपूर्वी सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. मागील अडीच वर्षांत त्यांनी 37 हजार 700 किलोमीटर सायकल चालवली आहे. सायकलिंगमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या संपल्या असल्याने ते नेहमी अशा लांब पल्ल्याच्या सायकलिंगवारीत सहभागी होत असतात.
निगडी ते कन्याकुमारी या सायकलवारीसाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक संजय जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी सहकार्य केल्यामुळे निगडी ते कन्याकुमारी ही सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे अजय दरेकर यांनी संगितले.
त्यांच्या या यशस्वी सायकलवारीनिमित्त कामशेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम आयोजित करून अजय दरेकर यांचा सन्मान देखील केला.