पोलीस आणि गोरक्षकांनी सात गायींसह नऊ जनावरांची बेकायदा वाहतूक रोखली
येणवे गावातातील प्रकार; अंधाराचा फायदा घेत टेम्पोचालक व त्याचा साथीदार पसार
खेड : सात गायींसह नऊ जनावारांची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो खेड पोलिसांनी रोखला. या कारवाईत तीन लाख ४५ हजार रुपयांची जनावरे आणि टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कारवाईपूर्वी टेम्पो चालक आणि त्याच्या एका साथीदाराने धूम ठोकली. खेड तालुक्यातील येणवे गावात मंगळवारी (१९) पहाटे चारच्या सुमारास ही कारवाई केली. यामध्ये नऊ जनावारांची सुटका करण्यात पोलीस आणि गोरक्षकांना यश आले.
या प्रकरणी पोलीस नाईक शेखर चिमणा भोईर (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. शेखर भोईर यांच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील येणवे गावात मंगळवारी (दि. १९) पहाटे चारच्या सुमारास सहायक पोलीस फौजदार कारभळ यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी पोलीस कर्मचारी शेखर भोईर, पोलीस अंमलदार भंडारे, निलेश चासकर यांच्यासह व त्यांचे चार साथीदार व दोन पंच यांनी येणवे गावात नाकाबंदी लावली होती.
या नाकाबंदीमध्ये एक टेम्पो (एम.एच. ०६/ए.क्यू./४७३५) गावातून जात होता. संशयावरून पोलिसांनी हा टेम्पो रोखला. या टेम्पोमध्ये एक बैल, एक कालवड आणि सात गायी अशी नऊ जनावरे गर्दी करून उभी होती. ही सर्व जनावरे दोरीने घट्ट बांधून, त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा स्थितीत दाटीवाटीने भरण्यात आली होती. या सर्व जनावरांसाठी कोणताही चारा, पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केली होती. या जनावरे कत्तलीकरिता घेवून जात असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले आहे, असे पोलीस नाईक भोईर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
टेम्पो चालकाने नाकाबंदीचे आधीच टेम्पो थांबवून त्यामधून टेम्पो चालक व त्याचे बाजूस बसलेला साथीदार असे दोघांनी टेम्पोमधून खाली उडी टाकून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपांमध्ये पळून गेल्याने हाती लागले नाही. म्हणून टेम्पो चालक व त्याचा साथीदार यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायदा कलम 11(1) (ड), 11 (1) (ई), 11 (1) (एच), महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5(अ) (ब), मो. वा. का. कलम 83/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईत टेम्पो, एक बैल, कालवड आणि दोन जर्शी गायी, दोन गावठी गायी, तीन काळ्या रंगाच्या जर्शी गायी असा तीन लाख ४५ हजार रुपयांची जनावरे आणि टेम्पो ताब्यात घेतला आहे.