राज्यपालांकडून पसायदान ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघालेल्या पसायदानातील ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का बसला.’विसावा’ ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेच्या ४० सदस्यांनी अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी राज्यपालांनी त्यांना तोंडपाठ असलेल्या ओव्या सहजतेने म्हणून दाखवल्या.
भगवदगीतेतील काही श्लोक वारंवार उद्धृत केले जातात त्यामुळे ते लोकांच्या परिचयाचे झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, संत तुकारामांचे अभंग आदी संत साहित्यातील निवडक श्लोक देखील व्यवहारात वापरून रूढ केले पाहिजे जेणेकरून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे राज्यपालांनी यावेळी कौतुक केले.
संस्थेचे प्रतिनिधी गणेश आंबर्डेकर यांनी संस्थेतर्फे केल्या जात असलेल्या विविध सेवाकार्यांची तसेच आठवडी उपक्रमांची राज्यपालांना यावेळी माहिती दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील बांदेकर, सुरेंद्र देवस्थळी, सुलोचना बापट, उर्मिला परांजपे, सचिव राजीव पाठारे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. राज्यपालांसोबत झालेल्या भेटीनंतर उपस्थितांनी राजभवनात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू, देवी मंदिर तसेच भुयाराला भेट दिली.