“झाडे लावा खड्डे जगवा”; राजगुरुनगरमध्ये छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संघटनेचं अनोखं आंदोलन
शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या मुद्यावर संघटना आक्रमक
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या मुद्यावर छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांची ही अवस्था झाली असल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेच्या या भोंगळ्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संघटनेने “झाडे लावा खड्डे जगवा” असे अनोखे आंदोलन केले.
राजगुरुनगरवासीयांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने रस्त्यांची कामे लवकर करावी अन्यथा पुढील आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हुतात्मा राजगुरूंच्या या पावन नगरीत ही रस्त्यांची अवस्था कुणामुळे झाली? रस्त्यांची दुरावस्था आणि त्यावरून होणा-या राजकारणामुळे राजगुरुनगर वासीय हे नाहक भरडले जात आहेत. तरीही कुठलाच लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवताना दिसत नाही. फक्त निवडणुका जवळ आल्या की या खड्यांमध्ये मुरूम टाकतात आणि इतर वेळी दुर्लक्ष करतात. ही भावना आंदोलनाच्या माध्यमातून स्वराज्य संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ ढोले यांनी व्यक्त केली.
राजगुरुनगरकरांचा कुणीही अंत पाहू नये. तसं झाल्यास पुढील होणा-या निवडणुकीत ज्यांनी मतदारांना खड्डे दाखवलेत त्यांना राजगुरुनगर ची जनता खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे सदस्य आणि राजगुरूनगर येथील रहिवासी नितीन सैद, कैलास घनवट, सौरभ दौंडकर, आकाश करंजेकर, शुभम बोंबले, जयदीप शिंदे, केतन पारख, संदेश खैरे, सिद्धार्थ गारगोटे, अक्षय गोपाळे, सोन्या ढोले, अभिषेक कुंभार, राज भन्साळी, संकेत खळदकर, ऋषी होले आदी उपस्थित होते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES