मुंबईतील फनेल झोनमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी आराखडा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुनील प्रभू, अमीन पटेल, रविंद्र वायकर आदींनी उपस्थित केलेल्या नियम २९३ अन्वये प्रस्तावावर उत्तर देताना शिंदे बोलत होते.
नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील फनेल झोनमध्ये अनेक उंच जुन्या इमारती आहेत. त्यांची उंची वाढविता येणार नसली तरी या इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. यामध्ये फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सवलती देण्याविषयी विचार करण्यात आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत शासन सकारात्मक असून या भागातील नागरिकांना न्याय देण्यात येईल,असेही शिंदे यांनी सांगितले.