कोरोना विरूध्दच्या लढ्यात शासनाच्या प्रयत्नांना जनतेनी साथ द्यावी – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात
भंडारा : मुंबई, पुण्यानंतर लसीकरण झालेला जिल्हा म्हणून राज्यात भंडाऱ्याने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. डिसेंबर अखेर राबविलेली विशेष लसीकरण मोहीम मिशन लेफ्ट आऊटची केलेली कामगिरी नक्कीच प्रशंसनिय असल्याचे पालकमंत्री डॉ. कदम म्हणाले. लसीकरणाच्या कामासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलिस अधिक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील व अधिकारी उपस्थित होते.
सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगीरीसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांची भारतीय पोलीस सेवेत पदोन्नत्ती झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अनिल भूरे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. कोरोना नियंत्रणात उत्तम काम केल्याबद्दल आरोग्य व अन्य क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून त्याच दृष्टीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. 31 हजार 592 खातेधारक शेतकऱ्यांना 155.20 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमात सन 2020-2021 मध्ये 90 हेक्टर प्लास्टीक मल्चींग करीता 120 शेतकऱ्यांना 14 लाख अनुदान दिले आहे. तसेच भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी रोप वाटीकांची उभारणी झाली असून 13 लाख 80 हजार खर्च झाला आहे.
जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व शेतकऱ्यांना डिजीटल सातबारा उताऱ्याची प्रत घरपोच मोफत उपलब्ध करून देण्याची मोहिम 2 ऑक्टोबर 2021 पासून राबविण्यात आली. यामध्ये आपल्या जिल्ह्यात 2 लाख 39 हजार 787 शेतकरी खातेदारांना घरपोच सातबारा वाटप करण्यात आले आहे. यापुढे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर सरकार म्हणूनच नावलौकीक कायम राहील, असे आश्वासक प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.
तरूणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे या हेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत 2020-2021 मध्ये 77 लाभार्थ्यांना 140.49 लक्ष मार्जिन मनी मंजूर करण्यात आले. त्यापैकी लाभार्थ्यांना 135.45 लक्ष वाटप करण्यात आल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.
श्रमकरी, कष्टकरी जनतेला आघाडी शासनाने कोविड काळात मदत केली आहे. घरेलु कामगार कल्याण मंडळात नोंदीत व नुतनीकरण असलेल्या घरेलू कामगारांना कोविड काळात प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे 1033 लार्भार्थ्यांना 15 लाख 49 हजार 500 डिबीटीव्दारे अर्थसहाय्य करण्यात आले, असल्याची माहिती त्यांनी भाषणादरम्यान दिली.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एक कोटी 77 लाख 67 हजार 425 पेक्षा जास्त रक्कम विमा कंपन्यामधील रुग्णालयास अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना 1 लक्ष 92 हजार ई-कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
माता बाल आरोग्यासाठी शासन संवेदनशील आहे. मानव विकास कार्यक्रमांमध्ये 7514 गरोदर मातांची तपासणी, 2414 स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली असून कोरोनासह अन्य आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी उत्तम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणने आपल्या कार्यक्षेत्रातील कृषीपंप ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षेत तरूणांचा टक्का वाढण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले आहे. या करीता लागणाऱ्या पुस्तके, इंटरनेट, संदर्भ ग्रंथ खरेदीसाठी 25 लाखाची तरतूद करण्यात आली, असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रगतीपर विकासकामांचा उल्लेख करत पालकमंत्र्यांनी लसीकरणासाठी नागरिकांनी पूढे यावे, असे आवाहन केले. कोरोना विरूध्दचा लढा हा सामुहिक असून त्या दृष्टीने करत असलेल्या शासनाच्या प्रयत्नांना जनतेनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मुकूंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची पुस्तिकेचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रकाशन
राज्यातील महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची या पुस्तिकेचे जिल्हास्तरीय प्रकाशन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलिस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते.
राज्यात शासनाने कोरोना संकटाशी लढत असतांना वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमाने काम करायला सुरूवात केली. संकटाचे संधीत रूपांतर केले. दोन वर्षात आरोग्य यंत्रणेच्या सक्षम बळकटीकरणासह विविध क्षेत्रात केलेल्या विकासकामांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले आहे.