पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू
चाकणच्या मुटकेवाडी परिसरातील घटना; ट्रक चालकाला अटक
चाकण । सह्याद्री लाइव्ह । पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या पादचा-याचा मृत्यू झाला. नाणेकरवाडी-मुटकेवाडी येथील शहा पेट्रोलपंपासमोरील सिग्नलजवळ सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
विकास खंडू ठाकरे (वय ३९, रा. ब्राह्मण आळी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. नागनाथ, ता. सटाणा, जि. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याबाबत भानुदास दशरथ डमाळे (वय ३८, रा. पिरेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचा ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश शंकर केदारी (वय ३८, रा. ब्राह्मणआळी, चाकण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकास ठाकरे हा सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होता. त्यावेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणा-या ट्रक (एम.एच.१४/डी.एम./९१७७) जात होता. त्यावेळी चालक भानुदास डमाळे चालवत असलेल्या ट्रकची विकास ठाकरे यांना धडक बसली. या धडकेत विकास ठाकरे गंभीर जखमी झाले. अपघातात ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालक भानुदास डमाळे याला अटक केली आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.