पीककर्ज वाटपाचा आढावा 15 दिवसांनी घेणार
पुणे : जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील निरनिराळ्या पीकांचे 2022-23 या वर्षासाठीचे पीककर्ज दर निश्चित करण्यात आले. पीकाचे उत्पन्न, त्यासाठी येणारा खर्च व राहणारा नफा यांची सांगड घालून पीककर्ज दर ठरविण्यात आले आहे. दर 15 दिवसांनी कर्ज वाटपाचा आढावा घेणार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
नाबार्डच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक रोहन मोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सहकार विभागाचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, कृषी विभागाचे उपसंचालक विजय कानडे, अग्रणी बॅंकेच्या बॅंक प्रतिनिधी किरण अहिरराव, कृषी विस्तार संचालक शांताराम साकोरे उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी व इतर जिल्हा तांत्रीक समिती सदस्य यांचेशी पीककर्ज दर चर्चा करण्यात आली.
मागील तीन वर्षातील सर्वात अधिक कर्ज वाटप केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अभिनंदन केले. 2021-22 हंगामामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 3 हजार 43 कोटीरुपये कर्ज वितरणापैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2 हजार30 कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे. या बैठकीस पशुसंवर्धन व दुग्ध विकास, मत्स्य विभाग, पुणे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, कृषी अर्थशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणेचे प्रतिनिधी, जिल्ह्यात कर्ज पुरवठा करणाऱ्या प्रमुख व्यापारी व खासगी बॅंकांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील प्रत्येकी एक प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.