प्रत्येक संकटावर मात करून विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : स्वातंत्र्याबरोबरच न्याय, समता, बंधूता, एकता ही मूल्ये स्वीकारुन देशाने जगाच्या पटलावर स्वत:ची दृढ ओळख निर्माण केली आहे. याच लोकशाही मूल्यांशी बांधिलकी ठेवून महाविकास आघाडी शासनाची वाटचाल होत आहे. प्रत्येक संकटावर मात करत यापुढेही विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान ठेवण्याचा निर्धार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धानपनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत कार्यक्रम झाला.
पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी विविध क्षेत्रांतील विधायक बदलांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक, लोकहितकारी व गतिमान करण्याचा निर्धार श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या साथीशी गेल्या दोन वर्षापासून झुंजत असताना विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान आहे. कोविड केअर सेंटर उभारण्यापासून ते लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यापर्यंत अनेक टप्पे यशस्वीपणे पार पाडले. लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. या काळात इतर आजारांच्या उपचार सुविधाही जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयातून प्रभावीपणे राबविण्यात आल्या. बाह्य रुग्ण सेवेपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत अनेक सुविधांचा 17 लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला
शेतकरी बांधवापुढे कोविड काळात अनेक संकटे उभी राहिली. या काळात प्रत्येक टप्प्यावर मदत योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात जलदगतीने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करुन मदत मिळवून देण्यात आली. गत काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या 1 लाख 99 हजार 869 शेतकऱ्यांना एकूण 139 कोटी 21 लाख 5 हजार 262 रूपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, त्याचे वाटप गतीने सुरु आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामात 53 हजार 303 शेतकऱ्यांना 22 कोटी 55 लाख रुपये वाटप करण्यात आले. हवामानाधारित फळपिक विमा योजनेत 5 हजार 498 शेतकऱ्यांना सुमारे 63 कोटी मदत प्रस्तावित आहे. रानभाजी महोत्सव, जिल्हास्तरीय महिला किसान दिवसासारख्या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. कृषी संजीवनी सप्ताहात 258 गावांत 3 हजार 664 शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात ऑनलाईन 80 अर्ज प्राप्त असून कार्यवाही होत आहे.
पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ‘मनरेगा’मध्ये 2 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे व पुढील वर्षासाठी 6 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. विकेल ते पिकेल या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात 295 विक्री केंद्रे सुरु केली आहेत.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत यावर्षी एकुण 2 हजार 919 लाभार्थ्यांना 6 कोटी 87 लक्ष रुपयाचे अनुदानवाटप करण्यात आले. 16 शेतकरी उत्पादक गट, कंपनी, महिला बचत गटांना 1 कोटी 18 लक्ष रुपये अनुदान आणि सूक्ष्म सिंचन योजनेत 1 हजार 621 लाभार्थ्यांना 2 कोटी 59 लाख रुपये वितरित करण्यात आले.
महिला व बालविकास विभागाने राष्ट्रीय पोषण महाअभियानात संपूर्ण राज्यातून दुसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील 59 अंगणवाडी केंद्राचे बांधकाम अधिक नाविण्यपूर्ण पध्दतीने करण्यात येणार आहे. ते राज्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून त्यात विशेष ॲक्टिविटी रुम, तपासणी कक्ष, विशेष किचन आणि वेगळे स्वच्छतागृह असणार आहे. त्यामुळे अंगणवाडीचे रुपडे पालटणार आहे. महिला व बालविकास भवनाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी सव्वाचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अमरावती पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पोलीस विभागातर्फे सुरू केलेल्या डायल 112 ही सेवा, रक्षादीप उपक्रमाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
त्या पुढे म्हणाल्या की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे 4 हजार 173 कामे सुरु असुन त्यावर 83 हजार 972 मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मेळघाटात त्यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. आजपर्यंत 63 लक्ष 02 हजार 481 मनुष्यदिन निर्मिती 91.67 टक्के साध्य करण्यात आली. त्यात एकूण 12 हजार 574 कामे करण्यात आली. अमरावती जिल्हा मनरेगा कामांमध्ये गतवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर होता.
अनुसुचित जाती व नवबौद्ध कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेत महानगरपालिका क्षेत्रात 4 हजार 561, नगरपालिका क्षेत्रात 4 हजार 191 तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत 21 हजार 614 घरे असे एकूण 30 हजार 366 घरे पूर्ण करण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागात 52 हजार 276 घरे पूर्ण करण्यात आली.
समतोल औद्योगिक विकास घडविण्यासाठी समूह विकास योजनेत जिल्ह्यातही ठिकठिकाणी कामे प्रस्तावित आहेत. अमरावतीत सोलर चरखा क्लस्टर, अगरबत्ती क्लस्टर, परतवाड्यात टिकवूड फर्निचर क्लस्टर, अंजनगाव सुर्जी येथे गारमेंट क्लस्टर, दर्यापूर येथे लेदर क्लस्टर, अंजनगाव सुर्जी येथील रेडिमेड गारमेंट क्लस्टर, अचलपूर येथे मिल्क प्रोडक्ट क्लस्टर, मेळघाटात मिल्क प्रोसेसिंग क्लस्टर अशी अनेक क्लस्टर्स विकसित करण्यात येत आहेत.
नांदगावपेठनजिक अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून, 14 टेक्सटाईल्स उद्योगांद्वारे 1 हजार 875 कोटींची गुंतवणूक व सुमारे 5 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 6 हजार 660 सुक्ष्म व लघू उपक्रम सुरु असून त्यात 1 हजार 582 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून 41 हजार 793 लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे.
जल जीवन मिशनमध्ये 7 प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून, त्याच्या 300 कोटी 62 लाख रूपये निधीला प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे, येथील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चेअरमन किशोर राजे निंबाळकर, राज्य माहिती आयुक्त विनयकुमार सिन्हा, एमपीएससीचे सदस्य देवानंद शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, डॉ. नितीन व्यवहारे, रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, ओएसडी रवी महाले, अरविंद माळवे, अमोल साबळे आदी यावेळी उपस्थित होते.