प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ‘वंदे भारत’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीपर गीते, अनसंग हिरो यांच्या कार्यावरील सॅण्ड आर्ट, पोवाडे, नृत्य व इतर कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माजी अतिरिक्त मुख्य सचिव एस. जम्बुनाथन, उपसचिव विलास थोरात, अवर सचिव बाळासाहेब सावंत उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ‘वंदे भारत’ या कार्यक्रमास सुरुवात झाली. जय जय महाराष्ट्र माझा, ने मजसी ने परत मातृभूमीला, शूर आम्ही सरदार आम्हाला, वेडात मराठे वीर दौडले सात अशा विविध देशभक्तीपर गीत गायन व नृत्याचे सादरीकरण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन केलेल्या नृत्य गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर काही हिंदी गीते, अनामवीरांच्या कार्यावर आधाराची सॅण्ड आर्ट, समूह नृत्य अशा विविधरंगी सादरीकरणाची रेलचेल होती. मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या यु-ट्युब आणि फेसबुक पेज वरून करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचा आस्वाद अनेक रसिकांनी घेतला.