POSITIVE NEWS : संत निरंकारी मिशन तर्फे राजगुरुनगर शहरात ‘स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान’
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । संत निरंकारी मिशनच्या राजगुरुनगर शाखातर्फे प्रेजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान’ रविवारी (दि. २६) राबविण्यात आले. या अभियानात राजगुरुनगर स्मशानभूमी आणि भीमानदीतील जलपर्णी, कच-याची सफाई करण्यात आली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सहकार्याने संत निरंकारी मिशनतर्फे हे अभियान राबविण्यात आले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाचे उद्घाटन राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा अभियंता व स्वच्छता विभागाच्या अधिकारी चारुबाला हरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजगुरूनगर नगरपरिषदेचे लेखापाल विकास वाघमारे, राजगुरुनगर नगरपरिषदेच्या संगणक अभियंता प्रतीक्षा निकुंभे, सामाजिक कार्यकर्ते अरूण गायकवाड, संत निरंकारी मंडळाच्या पुणे विभागाचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मंडळाचे राजगुरुनगर शाखा प्रमुख बाळासाहेब जाधव, सेवादलचे संचालक नरेंद्र राजपूत, सेवादल शिक्षक राकेश थिगळे, मुख्य लेखापाल अशोक कोळी, अनील जाधव, प्रेस इंचार्ज किरण गोसावी, संजय पवार, ज्ञानेश्वर कोळी, प्रकाशन विभागाचे संपत वाळूंज, भगवान टाकळकर, अक्षता काळे, कीर्ती सोनटक्के तसेच निरंकारी मिशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
स्वच्छता विभागाच्या अधिकारी चारूलता हरडे म्हणाल्या की, संत निरंकारी मिशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे. निरंकारी मिशन दरवर्षी अशा प्रकारचे स्वच्छता अभियान आणि वृक्षलागवड आदी उपक्रम राबवून नेहमी आपल्या शहराला आणि गावाला सहकार्य करत असतात. मानवसेवा हीच ईश्वरसेवा याचे ब्रीद समजून वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याने निरंकारी मिशनच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
संत निरंकारी मिशनच्या द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. ज्यामध्ये मुख्यता: रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नि:शुल्क आरोग्य तपासणी, महिला सशक्तीकरण, बाल-विकास नैसर्गिक आपत्तीच्यावेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यांसारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारद्वारे संत निरंकारी मिशनला वेळोवेळी सन्मानीत करण्यात आले आहे.
तत्कालीन सदगुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांची शिकवण आहे, प्रदूषण आतील असो की बाहेरचे, दोन्हीही हानिकारक आहे. या संकल्पनेला सार्थ ठरवत या अभियानात स्वयंसेवक स्वच्छतादूत बनले. राजगुरूनगर येथील स्मशानभूमीजवळील कचरा तसेच भीमा नदीतील साचलेला प्लॅस्टिक कचरा साफ केला. यावेळी दोन ट्रॅक्टरच्या ट्रोल्या, एक जेसीबी व चार गाड्या बरोबर घेऊन संत निरंकारी मिशनच्या महिला व पुरूष २०० सदस्यांनी अभियानात सहभागी झाले होते. तसेच राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १०० कर्मचा-यांनी सहभाग नोंदविल्याचे संत निरंकारी मिशनच्या राजगुरुनगर शाखेचे प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
चारूलता हरडे यांनी आभार मानले.