हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात पुस्तक भेट कार्यक्रमाचे आयोजन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी पुस्तक भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १७० विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आले.
महाविद्यालयाच्या मराठी विभागातील एम. ए. या वर्गातील विद्यार्थिनी प्रतीक्षा खराडे या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसह (जेआरएफ) उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, एसबीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी वैचारिक समृद्धतेसाठी ग्रंथांची भूमिका मोलाची असून विद्यार्थ्यांसह सर्वांनीच आपापल्या जगण्याला ग्रंथधर्माचे अधिष्ठान द्यायला हवे, असे आवाहन केले.
ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील पुढे म्हणाले, पुस्तकांच्या वाचनातून नवे सूचने, नवे कळणे चालू राहते. त्यामुळे माणूस आतून फुलून येतो. म्हणून ग्रंथांचा परिसस्पर्श आपल्या आयुष्यात व्हावा. त्यांनी मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या पुस्तक भेट उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाचन संस्कार रुजविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना डॉ. संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रूजावी यासाठी पुस्तक भेट उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी तर आभार डॉ. संजय शिंदे यांनी मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES