राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी जुन्या पदाधिका-यांच्या सुपुत्रांना संधी
राजगरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. दिनेश ओसवाल यांची अध्यक्ष म्हणून तर अविनाश कहाणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
राजगुरुनगर बॅंकेच्या पदाधिकारी निवडीसाठी गुरुवारी (दि. २२) बॅंकेच्या राजगुरुनगर येथील मुख्य शाखेच्या सभागृहात विशेष सभा आयाजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहनिबंधक हरिश्चंद्र कांबळे हे सभागृहात उपस्थित होते.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही जागांसाठी निर्धारित कालावधीमध्ये प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामूळे निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
दिनेश ओसवाल यांचे वडील रमेश ओसवाल हे २००४ साली बॅंकेचे अध्यक्ष होते, तर पहिल्यांदाच निवडून आलेले अविनाश कहाणे यांचे वडील तुकाराम कहाणे १९६० मध्ये उपाध्यक्ष होते. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही महत्वाच्या पदांवर यावेळी जुन्या पदाधिका-यांच्या सुपुत्रांना संधी मिळाली आहे.