मतदारसंघ पिंजून काढण्याची विद्यमान आणि इच्छुकांना संधी
अंतिम प्रभाग रचना मार्चमध्ये होणार
पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मार्चमध्ये प्रभाग रचना अंतिम होणार असल्याने या “टर्म’ मधील नगरसेवकांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मतदारसंघ पिंजून काढता येणार आहे. विद्यमानांना विकासकामे करता येणार आहेत. तर, इच्छुकांना मोर्चेबांधणी करता येणार आहे.
याशिवाय प्रत्येक टर्मच्या शेवटी सत्ताधारी पक्ष अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करतो. त्यामुळे सत्ताधारी भाजपलाही असे प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार 2 मार्चनंतर प्रभाग रचना अंतिम होणार आहे.
यामुळे एरव्ही निवडणुकांच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागत असल्याने विकासकामांची डेडलाइन शक्यतो डिसेंबरच होती. अंतिम वर्षांतील शेवटचे 9 महिनेच मिळत असल्याने निवडणुकीची तयारी आणि विकासकामे यामध्ये नगरसेवकांची मोठी धावपळ होत असे. परंतु यंदा निवडणूक प्रक्रियेला विलंब झाल्याने नगरसेवकांना तीन महिन्यांचा बोनस कालावधी मिळाला आहे.
प्रामुख्याने अगदी शेवटपर्यंत स्थायी समितीसह सर्व समित्या आणि मुख्यसभेचे काम चालणार असल्याने सत्ताधारी भाजपला निवडणुकीच्या अजेंड्यावरील महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाले आहे. तर नगरसेवकानाही शेवटच्या टप्प्यात ज्या प्रभागातून आगामी निवडणुकीला सामोरे जायचे आहे, त्या प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. प्रत्येक मतदार संघात असलेल्या इच्छुकांनाही मोर्चेबांधणी करण्यासाठी आणि मतदारांना भेटून, आपली छबी उमटवण्यासाठी वेळ मिळणार आहे.