संविधान दिनानिमित्त राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात कायदेविषयक जगजागृती शिबिर संपन्न
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त शनिवारी (दि. २६) कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा समिती खेड व राजगुरुनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबळकर होते. त्यांनी संविधानासंबंधीची माहिती देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राजगुरुनगर बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. नवनाथ गावडे, माजी अध्यक्ष अॅड. संजय पानमंद, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक गणेश घुमटकर, प्राचार्य एस. एस. जाधव, उपप्राचार्या एस. एस. कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख एस. पी. देशमुख, पर्यवेक्षक एस. डी. जाधव, अॅड. मनिषा टाकळकर, ॲड. आशा करमरकर, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विधी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. ॲड. नवनाथ गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यालयातील अध्यापिका शीला नाईकरे यांनी ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयावर, अॅड. गोपाल शिंदे यांचे ‘आदिवासी लोकांचे हक्क व अधिकार’ या विषयावर, अॅड. संदीप घुले यांचे ‘बालकामगारांचे अधिकार’ या विषयावर तर वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एम. बी. पाटील यांनी ‘संविधानातील हक्क व कर्तव्य’ व ‘वैकल्पिक वाद निवारण प्रणाली व फायदे’ या विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
खेड तालुका बार असोशिएशनच्या वतीने विद्यालयास तीन संविधानाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या.