आता राज्यात ऑनलाईन स्वरुपाचे ई रेशन कार्डच मिळणार
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्यात आता यापुढे ऑनलाईन स्वरुपाचे ई रेशन कार्डच मिळणार आहे. त्याचे वितरण सुरू झाले आहे. आता रेशन कार्डची मागणी झाली किंवा त्यात काही दुरूस्ती करण्याची वेळ आली तर त्यापुढे ई रेशन कार्डच दिले जाणार आहे. यामुळे जुनी पारंपारिक रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे.
यापुढे ऑनलाईन रेशन कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येकाला वेगळा असा क्यूआर कोड असणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरूस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे ही कामे आता घरबसल्या करता येणार आहेत.
राज्य शासनाने ई रेशनकार्ड देण्याबाबत २१ फेब्रुवारी २०२३ रोजी आदेश दिले होते त्यानंतर आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात सर्वत्र कामकाज सुरू झाले असून शहर अन्नधान्य वितरण कार्यालयात दाखल झालेल्या तीन अर्जांवर कार्यवाही करून संबधितांना ई रेशन कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
आता मोबाईल फोनमध्येही रेशन कार्ड
ई रेशन कार्ड डीजी लॉकरमध्येही दिसणार आहे. मेल, मोबाईल फोन आदींद्वारेही पीडीएफ, फोटोस्वरूपात हे ई रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES