शैक्षणिक साहित्य यंदाही नाहीच
मुलांना शिकवणार कसे? : पालकांचा सवाल
पुणे : करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन शाळा सुरू आहेत. शिक्षणासाठी मुलांना वह्या, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्यांची आवश्यकता असली, तरी सलग दुसऱ्या वर्षी मुलांची पटसंख्या माहिती नसल्याचे तसेच शाळा ऑनलाइन सुरू असल्याचे कारण पुढे करत महापालिकेने या मुलांना शालेय साहित्यांचे अनुदानच दिलेले नाही. त्यामुळे आधी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नाही आणि दुसऱ्या बाजूला अभ्यासासाठी शैक्षणिक साहित्यच नाही. त्यामुळे मुलांनी शिकायचे कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा सुमारे 250 वर शाळा आहेत. यात करोना संकटापूर्वी सुमारे एक लाख मुले शिकत होती. येथील बहुतांश मुले आर्थिक दुर्बल घटकांतील असतात. त्यामुळे महापालिका या मुलांना मोफत शिक्षणासह, दरवर्षी गणवेश, शालेय साहित्य पुरवते. शासन आदेशानुसार गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम “डीबीटी’द्वारे दिली जात आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष 2020-2021 आणि 2021-22 या दोन्ही वर्षांची ही अनुदानाची रक्कमच पालिकेने दिलेली नाही.
ही रक्कम प्रामुख्याने मुलांना वह्या, पेन, चित्रकला साहित्य तसेच शिक्षणासाठी आवश्यक इतर साहित्याची किंमत ठरवून पालिकेकडून प्रत्येक मुलाच्या बॅंक खात्यात ती थेट जमा केली जाते. त्या रकमेतून पालक हे साहित्य मुलांना घेऊन देतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून पालिकेने ही डीबीटीची रक्कमच दिलेली नाही.
लाभार्थी ठरत नसल्याने अडचण पालिका शाळांमधील बहुतांश मुले वस्तीपातळीवरील तसेच कामा निमित्ताने स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील आहेत. पहिल्या लॉकडाऊन काळात अनेक पालक शहर सोडून गेले. तर त्यानंतर काही मुले नव्याने आली आहेत. मात्र, शाळाच सुरू नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर प्रवेश घेतलेली अनेक मुले शाळेत आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या निश्चित करण्यास उशीर झाला आहे.
मागील महिन्यात शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने डीबीटीची रक्कम देण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. त्यात, पूर्ण आठवडा शाळेत आलेल्या मुलांना रक्कम दिली जाणार होती. मात्र, लगेचच पुन्हा शाळा बंदचा निर्णय झालेला आहे. त्यातच आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असल्याने आणि शाळा पुन्हा कधी सुरू होणार, याची अनिश्चितता असल्याने या वर्षीही अनुदान दिले जाणार नसल्याची चर्चा आहे.