खेड तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी!
आमदार मोहितेंनी एक पाऊल मागे घेताच जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा मार्ग खुला
खेड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co-operative Bank) संचालकपदी, ‘अ’ गटातून, खेड तालुका मतदारसंघातून गटातून आमदार दिलीप मोहिते पाटील ((Dilip Mohite-Patil) यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाचे शरद बुट्टे पाटील ((Sharad Butte patil) यांनी मागे घेतल्याने, मोहिते यांची बिनविरोध निवड ही फक्त औपचारिकताच राहिली आहे. एकमेकांतील वैयक्तिक वाद, मतभेद व कटुता संपवून, मात्र राजकीय वाटा वेगळ्या ठेवत, सामोपचाराची भूमिका ठेवण्याचे ठरवून हा समेट झाल्याचे दोघांकडूनही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
शरद बुट्टेपाटील यांच्यावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पंधरा वर्षांपूर्वी १ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा लावला होता. तो दावा खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांसमोर सुरू होता. या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमध्ये सामोपचार करण्यासाठी मध्यस्थांनी प्रयत्न केल्यावर दोघांनाही सकारात्मक प्रतिसाद देत फक्त निवडणुकीपुरती माघारीसाठी तडजोड नाही, तर सर्वच वैयक्तिक वाद, मतभेद व कटुता संपवून पुढील वाटचाल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार न्यायालयातील वादात आजच न्यायाधीशांसमोर तडजोडीचा प्रस्ताव देत दावा मागे घेतला. न्यायाधीशांनी त्यास मान्यता दिली.
मुळात त्या बातमीत पत्रकाराने माझे विपर्यस्त म्हणणे मांडले होते, त्यामुळे आमदारांचा गैरसमज झाला होता, असेही बुट्टे म्हणाले. दरम्यान बुट्टे यांच्या सूचकाने पुण्यात त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर मोहिते व बुट्टे यांनी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील दालनात पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. पक्षाचे नेते बाळा भेगडे, अतुल देशमुख यांच्याशी चर्चा करून आणि लक्ष्मण टोपे यांच्या मध्यस्थीनंतर माघारीचा निर्णय घेतला. राजकीय विचार वेगळे असले तरी राजकीय सुसंस्कृतता पाळून मोहिते यांचा कधी अनादर केला नाही.
तालुका विकासात पुढे गेला पाहिजे, अशी दोघांचाही भूमिका व प्रत्यक्षात कृतीही असते. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध नको, म्हणून उमेदवारी मागे घेतल्याचे बुट्टे यांनी सांगितले. राजकीय भूमिका वेगळ्या राहतील; मात्र यापुढे वैयक्तिक आरोप वादविवाद ठेवणार नाही. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता मनमोकळेपणाने कटुता संपवित आहोत, असे बुट्टे यांनी स्पष्ट केले.
तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व्यक्तीगत वाद नको असा प्रस्ताव मांडण्यात आला. बुट्टेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुक्यात लाखभर लोकांना रोजगार उपलब्ध होतील, म्हणून एसईझेड व्हावा, अशी शरद पवार यांचा दृष्टिकोन होता. त्यांची भूमिका मांडत मी एसईझेडला पाठिंबा देत होतो. त्यावेळी गंभीर आरोप झाल्याने मनाला लागले, म्हणून दावा लावला होता, असे मोहिते म्हणाले.
मी आता हळूहळू राजकीय निवृत्तीकडे वळत आहे. त्यामुळे व्यक्तीगत वाद ठेवायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. बुट्टे यांचेबरोबरचे वाद संपले आहेत. राजकीय मतभेद होते तरी बुट्टेंनी विकासात कधी अडथळा आणला नाही. मीही त्यांच्या विकासकामांना कधी विरोध केला नाही. बुट्टे अभ्यासू आहेत. त्यांनी शून्यातून राजकीय स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी तालुक्याच्या भावी दृष्टीने चांगले नेतृत्व घडविणे माझे कर्तव्य आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र राहत नाही, अशी भूमिका मोहितेंनी मांडली.
इतर तालुक्यांनी जसे बिनविरोध संचालक निवडून दिले, तसे खेडमध्येही करण्याचा पायंडा आम्ही पाडत आहोत. राजकीय मतभेद होत राहतील तालुक्यात कामे खूप आहेत आणि दोघेही आमच्या परीने योगदान देऊ. बुट्टेंचे भवितव्य उज्ज्वल राहील. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा आहेत, अशी पुस्ती आमदारांनी जोडली. निवडणुकीसाठी, खेड तालुका विकास सोसायटी गटातून म्हणजेच ‘अ’ गटातून आमदार मोहिते, हिरामण सातकर आणि बुट्टे पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. बुट्टे यांनी माघार घेतली आहे. उद्या सातकर माघार घेणार आहेत. तशी जाहीर घोषणा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मेळाव्यात केलेली आहे.