उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेची नवी ‘श्रीराम ठेव योजना’
अध्यक्ष दिनेश ओसावाल यांची माहिती : २२ जानेवारी ते ३१ मार्च कालावधीत ग्राहकांना मिळणार लाभ
खेड । सह्याद्री लाइव्ह । अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पणाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेने नवी ठेव योजना सुरू केली आहे. ‘श्रीराम आवर्त ठेव योजना’या नावाने योजना ही सुरू केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होणार आहे. समस्त भारतीयांमध्ये या सोहळ्याचा उत्साह निर्माण आहे. या ऐतिहासिक क्षणाची आठवण राजगुरूनगर सहकारी बँकेच्या सभासदांमध्ये राहावी, यासाठी बँकेने श्रीराम आवर्त ठेव योजना सुरू केली आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत या योजनेला मान्यता देण्यात आली.
त्यासाठी बँकेने ७.७५ टक्के हा विशेष व्याजदर आकारला आहे. या आवर्त ठेवीचा कालावधी ६० महिने ठेवण्यात आला आहे. ही ठेव योजनेत, मासिक रक्कम ७०० रूपयांच्या पटीत ठेवता येणार आहे. ही योजना २२ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ एवढयाच कालावधीसाठी आहे. या ठेव खात्यालही ठेवी संबंधित अटी शर्ती लागू असणार आहेत, असे ओसवाल म्हणाले.
या आवर्त ठेव योजनेनुसार जर ७०० रूपये प्रति महिना आवर्त ठेव खात्यात जमा केले, तर ५ वर्षांनी ठेवीदारास ५१ हजार ३६२ रूपये मिळणार आहेत. तसेच १४०० प्रति महिना ठेवल्यास १ लाख २ हजार ७२४ रूपये मिळणार आहेत. म्हणजेच १४०० रूपये प्रति महिना जमा केल्यास पाच वर्षांत ठेवीदार लखपती होणार आहे. या योजनेसाठी सध्याच्या परिस्थितीत तुलनात्मकदृष्टया आपण उत्तम व्याजदर देत आहोत. इच्छुक खातेदारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा, असे अध्यक्ष ओसवाल यांनी स्पष्ट केले आहे.
या ठेव योजनेप्रमाणे बँकेने या वर्षी नाविन्यपूर्ण कर्ज योजनाही कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनांमध्ये शेतीपूरक कर्ज योजना असून त्याद्वारे जमीन सपाटीकरण, नवीन विहिर खोदाई, पाईपलाईन, विद्युत व सौर कृषी पंप, ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन, मळणी यंत्र, शेतमाल गोडाऊन, शीतगृह, गोठा बांधकाम आदींकरिता कर्ज देण्यात येते.
तसेच घरगुती सौर प्रकल्प व इंडस्ट्रियल रूफ टॉप सौर प्रकल्प उभारणीकरिता ५० लाखांपर्यंत कर्ज वाटप करण्यात येते. घरदुरूस्ती व घर नुतणीकरणासाठीही कर्ज योजना सुरू करण्यात आली असून, महानगर क्षेत्रात १० लाखांपर्यंत व अन्य ठिकाणी ६ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तसेच बँक शैक्षणिक कर्ज ७५ लाखापर्यंत देत आहे. या कर्ज योजना ११ टक्के या सवलतीच्या दराने सुरू केल्या आहेत, असे ओसवाल यांनी सांगितले.