कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे आरोग्यसेवकांची जबाबदारी वाढणार : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव (उमाका वृत्तसेवा): संपूर्ण जग कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज होत असताना कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे आरोग्य सेवकांच्या जबाबदारीत वाढ होणार असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनातील सर्व आरोग्य सेवकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकट काळात यशस्वी योगदान देणाऱ्या आरोग्य सेवकांचा सन्मान सोहळा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथील कृष्णा लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी महानगरपालीकेचे उपमहापौर निलेश आहेर, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश सोनवणे, महानगरपालीकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे, डॉ.शेवाळे, रामा मिस्तरी, संजय दुसाणे, विजया बेडसे, सुनंदा निकम, ताराबाई खैरनार यांच्यासह कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणारे सर्व आरोग्य सेविका, डॉक्टर्स, सर्व संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक, महिला व नागरिक उपस्थित होते.
येणाऱ्या नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी व अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करताना मंत्री भुसे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपल्या आरोग्य सेवकांचे योगदान निश्चितच कौतुकास पात्र आहे. पुढे येणाऱ्या कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटामुळे आपल्या सर्वांच्या जबादारीत निश्चितच वाढ झालेली आहे. ओमायक्रॉन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेवून संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक आदेशाची नविन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीचे प्रशासनासह नागरिक काटेकोर अंमलबजावणी करत कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी योगदान देतील, असा विश्वासही मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले, सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे चष्मे उपलब्ध करून देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. लवकरच सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार असून गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.