कोविड काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना आवश्यक निधी वितरीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : मागील पावणे दोन वर्षापासून राज्य शासन कोविड संकटाशी दोन हात करीत असून या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आवश्यक असणारा निधी वेळोवेळी वितरीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष थोटे यांनी विधानसभेत विचारला होता.
देशमुख म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांना कोविडकाळात आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच काही तातडीची औषधे खरेदी करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यातील वैद्यकीय रुग्णालयाला आवश्यक असणारी औषधे हाफकिन महामंडळामार्फत पुरविली जात असली तरी सध्याची परिस्थिती पाहता याबाबतही आवश्यक ते अधिकार या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येतील.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात या प्रकरणी सुरु असलेली कार्यवाही, वेगवेगळे आरक्षण, बिंदू नामावली यामुळे रिक्त पदे भरण्याबाबत विलंब झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरु असून याबाबत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदे वैद्यकीय संचालनालयामार्फत भरण्यात येत असताना याबाबतही कालबद्ध आराखडा आखून ही पदे भरण्यात येतील. काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवठा नियमित होत नसल्याबाबत तक्रारी येत असल्यास याबाबत तपासणी करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.