राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘घेरलं’!
शाब्दिक जुगलबंदी : भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीतर्फे खेडमध्ये हुतात्मा राजगुरू जयंतीदिनी क्रांतिकारकांच्या वंशजांचा सन्मान
खेड (जि. पुणे) । सह्याद्री लाइव्ह । कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समोरच ठणकावून सांगितलं. राज्यपालांनी स्वामी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा समाचार घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण, हे जाहीरपणे सांगितलं. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनीही सध्याचे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील जिव्हाळा सांगून टाकला.
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती (खेड तालुका) आणि हुतात्मा राजगुरू प्रेमी, सामाजिक संस्था यांच्या वतीने राजगुरुनगर (ता. खेड, पुणे) येथे हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त क्रांतिकारक वंशज यांच्या सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. खासदार डॉ. कोल्हे यांच्या यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी टाळलं. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं म्हणणं हे एकतर्फी राहील. कारण दुसरीकडे हुतात्मा राजगुरूंप्रमाणे अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं. हे विसरून चालणार नाही. याकडे राज्यपालांनी सर्वांचेच लक्ष वेधलं.
राज्यातील सध्याच सरकार हे राज्यपालांच्या ऐकण्यातलं आहे. त्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी मदत करा, असे आदेश ते या सरकारला देतील, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंनी केली. याला प्रतिउत्तर देताना तुमचे नामदार हे कामदार आहेत. मात्र फक्त नामाचा तर मी आहे, राज्यपालांकडे तर काहीच नसतं, असं मिश्कीलपणे नमूद केलं. पण पुढे बोलताना स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असं आश्वासन दिलं.
भारताला मी हनुमानाप्रमाणे समजतो. भारत हा माझा हनुमान आहे. जसं हनुमानाला पर्वत उचलणं शक्य वाटत नव्हतं; मात्र त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यावर हनुमानाने थेट पर्वत उचलून आणलं. तसाच आपला भारत आहे. बलाढ्य आहे. मात्र कोणीतही तो आत्मविश्वास भारताला देण्याची गरज आहे, असंही राज्यपाल यावेळी स्पष्ट केले.
वर्षात एका दिवशी या सगळ्या हुतात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करुन काहीही होणार नाही आहे. त्याचे विचार पेरायला हवे, पुढच्या पिढीपर्यंत ते पोहचवायला हवे. तरुणांना यासंदर्भात अभ्यास करायला लावायला हवा. जगात भारत पुढे न्यायचा असेल तर हा इतिहास आपण लक्षात ठेवायला हवा, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले.