राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई। सह्याद्री लाइव्ह। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते.
आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. विद्यापीठ दीक्षांत समारंभांमध्ये अधिकांश सुवर्ण पदक विद्यार्थिनी मिळवतात. भारतीय नागरी सेवेतील प्रथम तीन क्रमांक मुलींनी प्राप्त केले व यंग स्कॉलर्स पुरस्कार मिळविणाऱ्या अधिकांश विद्यार्थिनी आहेत तसेच अनेक शाळांचे प्राचार्य व शिक्षक देखील महिला आहेत, हा बदल सकारात्मक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
शिक्षक व प्राचार्यांनी मेधावी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे परंतु अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.
राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी, डीजी खेतान इंटरनॅशनल स्कूल, उत्पल संघवी ग्लोबल स्कुल, बिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कुल, अपिजे स्कुल खारघर, डी ए व्ही स्कूल ऐरोली, रायन इंटरनॅशनल कांदिवली, सोमय्या स्कूल, बॉम्बे स्कॉटिश, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल यांसह २४ शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना यावेळी सन्मानित करण्यात आले.