राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धवराव गाडेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : अकोला तालुक्यातील पाटसुल येथील श्री गुरुदेव सेवाश्रमाचे प्रमुख, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धवराव गाडेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर निष्ठा ठेवून ग्रामगीतेचा प्रचार-प्रसार हेच जीवनध्येय मानणाऱ्या डॉ. गाडेकर यांच्या निधनानं राज्यातील प्रबोधनाच्या चळवळीची हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
डॉ. उद्धवराव गाडेकर यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रगत, पुरोगामी विचारांचं राज्य आहे. सामाजिक सुधारणांच्या, प्रबोधनाच्या चळवळी महाराष्ट्रात सुरु झाल्या आणि देशात पोहचल्या. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळींना पुढे नेण्याचं काम ध्येयनिष्ठ किर्तनकारांच्या पिढ्यांमुळे शक्य झालं. डॉ. उद्धवराव गाडेकर हे किर्तनकारांच्या पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेला ग्रामसमृद्धीचा मंत्र गावोगावी पोहचवून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक विकासासाठी डॉ. उद्धवराव गाडेकर यांनी दिलेले योगदान स्मरणात राहील. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. दिवंगत डॉ. उद्धवराव गाडेकर यांच्या कुटुंबियांच्या आणि सहकाऱ्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो.”