नॅशनल गेम्स २०२२ : आज महाराष्ट्र महिला संघासमोर हिमाचल प्रदेश तर पुरुष संघाची लढत तामिळनाडू टीमशी
सोनाली, स्नेहलवर मदार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्राचे महिला आणि पुरुष कबड्डी संघ सोमवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयी सलामी देत नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा महिला संघ सलामी देण्यासाठी उत्सुक आहे.
यादरम्यान महाराष्ट्राच्या महिला संघाचा पहिल्या फेरीचा सामना हिमाचल प्रदेश टीमशी होणार आहे. तसेच महाराष्ट्र पुरुष संघासमोर तामिळनाडू संघ असेल. त्यामुळे आता महाराष्ट्राचे दोन्ही संघ आता या दोन्ही सामन्यात विजयाची नोंद करण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत.
याच स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव केला आहे. त्यामुळे आता तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे संघांचे विजयासाठीचे पारडे जड आहे.
महाराष्ट्र महिला संघाच्या विजयाची मदार ही सोनाली शिंगटे आणि कर्णधार स्नेहलवर असेल. इंटरनॅशनल रेडर सोनाली ही बोनस गुण संपादन करण्यात तरबेज आहे.