नामदेवांच्या कविता हेच त्यांचे खरे स्मारक – माजी आमदार गायकवाड यांचे प्रतिपादन
राजगुरुनगर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पुरस्काराचे वितरण
खेड : पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता हेच त्यांचे खरे स्मारक असून वेगळ्या स्मारकाची आवश्यकता नाही, असे प्रतिदान माजी आमदार व ढसाळ यांचे मावस बंधू जयदेव गायकवाड यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, शाखाध्यक्ष संतोष गाढवे, मसापच्या पुणे जिल्हा कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, ॲड. सतीश गोरडे, पी. टी. शिंदे, मारुती सातकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
गायकवाड पुढे म्हणाले की, नामदेवांचे शब्द हे मराठी साहित्याला नवीन होते. गोलपीठाची प्रस्तावना लिहिताना विजय तेंडूलकर यांना ते शब्द कळाले नाही म्हणून त्यांनी नामदेवला त्याचे अर्थ विचारले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे बोलताना साहित्यिक व जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे म्हणाले की, नामदेवांची कविता प्रत्येकाने वाचली पाहिजे. नवोदित कवींनी चांगले संग्रह विकत घेऊन वाचले पाहिजेत. गीत व कविता यातील फरक कवींना कळला पाहिजे. त्यासाठी ‘कवितेच्या कार्यशाळा’ झाल्या पाहिजेत, असे आवाहन गोंधळे यांनी केले.
यावेळी देवा झिंजाड (पुणे), संदीप काळे (नगर), संतोष कांदळे (नाशिक), भाग्यश्री केसकर (उस्मानाबाद), माधुरी मरकळ (नगर) यांच्या काव्यसंग्रहाना परितोषिके देण्यात आली. तसेच खेडचे भूमीपूत्र भूईदर गरुड (कला), कल्याणी रामाणे (शिक्षण), किरण आहेर (उद्योग), वैभव राक्षे (युवा) हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन (सामाजिक), राम पवळे (कृषी) या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. नीलम गायकवाड, सदाशिव अमराळे, प्रल्हाद शिंदे, संतोष गाढवे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन धर्मराज पवळे यांनी केले. मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.