वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन
शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु
पुणे : पश्चिम महाराष्ट्रात थकबाकीदारांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा सोयीचे व्हावे यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.
थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.
सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.