शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘भगवा जाणीव आंदोलन’
नारायणगाव । सह्याद्री लाइव्ह । छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्यासाठी भगवा जाणीव आंदोलन हा ट्रेलर आहे. मात्र पुढील वर्षी शिवजयंतीपूर्वी जर किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करु असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
मागील २ वर्षांपासून खासदार डॉ. कोल्हे सातत्याने शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा अशी मागणी करीत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांची भेट घेऊन आणि पत्रव्यवहार करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीतही खासदार डॉ. कोल्हे यांनी ही मागणी केली होती. त्याचबरोबर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी केंद्र सरकार ३७० कलम रद्द करु शकते तर ब्रिटीशकाळात अस्तित्वात पुरातत्त्व विभागाच्या नियमात का बदल करु शकत नाही असा जळजळीत सवाल उपस्थित केला होता. मात्र या मागणीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे उद्विग्न होत खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी भगवा – जाणिव आंदोलन जाहीर करीत शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती. तसेच शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी तिष्ठत ठेवलेल्या शिव-शंभु भक्तांसमवेत पायी गड चढून जाणार अशी भूमिका घेतली.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेला राज्यभरातील शिवभक्तांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यातच शासकीय कार्यक्रम होईपर्यंत गडाच्या पायथ्यापासून दूर अंतरावर रोखण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी पहिल्या पायरीवर जवळपास तासभरापेक्षा जास्त वेळ ठाण मांडले होते. त्यामुळे गडावरचा कार्यक्रम संपताच खासदार डॉ. कोल्हे यांच्यासमवेत शिवभक्तांनी गडावर जाताना त्यांच्या भगवा जाणीव आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिवनेरी गडावर भगवा ध्वज लागलाच पाहिजे अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, हे आंदोलन अजिबात राजकीय अथवा पक्षीय नाही. ही महाराष्ट्रातील शिव-शंभु भक्तांची भावना आहे, हीच भावना आपण मांडली असून केंद्र व राज्य सरकारला अल्टिमेटम देत एक वर्षाच्या कालावधीत शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला.