वर्षभरात 2 हजारांहून अधिक सर्पदंशाच्या घटना
बारामती आणि भोर तालुक्यात सर्वाधिक
पुणे : शेतीमधील कामांची लगबग, वाडी-वस्त्यांवर सर्पदंशाच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत. पावसाळा-हिवाळ्यामध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. यंदा वर्षभरात जिल्ह्यात 2 हजाराहून अधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये बारामती तालुक्यात सर्वाधिक 339 आणि भोर तालुक्यात 288 सर्पदंशाच्या घटना आहेत. वेल्हा तालुक्यात सर्वात कमी 49 घटना घडल्या
शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. विशेषत: पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळते. मुळशी, मावळ, बारामती, वेल्हे यासह अन्य तालुक्यांमध्ये भात लावणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच बारामती, इंदापूर, भोर, शिरूर या भागात बागायती शेतीही केली जाते. त्यामुळे याठिकाणी सर्पदंशाच्या घटना अधिक घडल्या आहेत.
ग्रामीण भागात अडगळीची ठिकाणे अनेक असतात. त्यामुळे मुले घराबाहेर खेळ असताना अडगळीच्या ठिकाणी जातात. त्यावेळी सर्पदंश झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मुलांनाही अडगळीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा. खुल्या मैदानात खेळायला सांगा. जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाची संख्या वाढत आहे. 2015 मध्ये जिल्ह्यात 1 हजार 655 सर्पदंशाच्या घटना घडल्या. 2016 मध्ये 1 हजार 830, 2017 मध्ये ही संख्या खूप कमी झाली. मात्र, 2021 मध्ये पुन्हा सर्पदंशाच्या घटना वाढल्याचे दिसून येते.
तालुकानिहाय सर्पदंशाच्या घटना
- आंबेगाव – 247
- बारामती – 339
- भोर – 288
- दौंड –193
- हवेली – 126
- इंदापूर – 146
- जुन्नर – 259
- खेड आणि मावळ प्रत्येकी – 131
- मुळशी – 67
- पुरंदर – 51
- शिरूर – 75
- वेल्हा – 49.