जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : राज्याच्या सार्वजनिक आरोग्यसेवेद्वारे शिबिर आदी उपक्रमांतून गरजूंपर्यंत उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न होतो. तथापि, शिबिरांची माहिती सर्वदूर पोहोचून अधिकाधिक गरजूंना शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत तिवसा उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व संवर्धन हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. आरोग्य शिबिरांचे आयोजन करताना त्याबाबत भरीव जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचवून अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून द्यावा.या शिबिरात विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला यामुळे एकाच दिवशी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिरात डिजीटल हेल्थ आयडी, आयुष्यमान कार्ड वाटप, तपासणी, उपचार, टेलीकम्युनिकेशन, स्त्रीरोग, प्रसुती, स्तनपान, लसिकरण, बालरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम समुपदेशन, गर्भनिरोधक साधनांचा वापर बाबत समुपदेशन, मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग, मोतीबिंदू, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार जसे उच्च रक्तदाब, मधुमेहाचे लवकर निदान, एच.आय.व्ही समुपदेशन, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा, दंत, कान, नाक, घसा, प्लास्टीक सर्जरी, त्वचा व त्वचाविज्ञान, आवश्यक रक्त चाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, आयुर्वेदिक, युनानी, सिदध, होमेओपॅथी, इतर तपासण्या व औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि संबंधित आरोग्य तज्ञांशी दूरसंचारव्दारे तपासणी (स्क्रिनिंग) आदी सेवा देण्यात आल्या.