राज्यात मान्सून सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता
कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । राज्यात मान्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. बुधवारी (दि. ५) कोकण, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे कोकण, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्याचा पुर्व भाग सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला आहे. तर पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीमध्येच आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगापूरपासून, दिल्ली, अलिगड, हमीरपूर, प्रयागराज, डाल्टेनगंज, बालासोरपासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे. १५ अंश उत्तर अक्षांशालगत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेश, गुजरातमध्येही चक्राकार वारे वाहत आहेत.
दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES