आमदारसाहेब हे तुमचं वागणं बरं नव्हं…!
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा आमदार सुनील शेळकेंवर पलटवार
मावळ (पुणे) । सह्याद्री लाइव्ह । मावळचे विद्यमान आणि उच्चशिक्षित आमदार सुनील शेळके यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे; परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रसिध्दीस दिलेले पत्रक व प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान हे त्यांच्या राजकीय, शैक्षणिक व कायदेशीर अज्ञानातून केलेले असल्याने, अशा बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा मी निषेध करतो व त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याला मी काही एक महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिले.
मावळ तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननाबाबत मी मा. हरित लवाद यांचेकडे याचिका दाखल केलेली आहे, ही याचिका न्यायाधीन असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान मी करणार नाही. त्याबाबत योग्य त्या चौकशी व निकालाअंती सर्व सत्यता समोर येईल.
परंतु आमदारांनी उपस्थित केलेल्या भूमिपूत्रांबाबतच्या आस्थेबद्दल मला खूप आश्चर्य वाटत आहे, कारण मावळ तालुक्यातील भूमिपूत्रांना ज्ञानदान करणाऱ्या व ज्ञानाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियोजित विद्यालयाच्या बांधकामास स्थगिती देण्याकरीता राजकीय दबाब निर्माण करून या बांधकामाची चौकशी करण्याकरीता जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पत्रव्यवहार करून हे बांधकामास स्थगिती देण्यात आलेली आहे.
सुमारे ५००० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या, मावळभूषण कृष्णराव भेगडे व कै. केशवराव वाडेकर व अनेक ज्येष्ठ संचालकांनी जतन केलेली व उद्योजक रामदास काकडे यांचे नेतृत्वात संस्था विकसित होत असताना, आमदारांच्या कर्तुत्वांमुळे संस्थेच्या विकासाला खिळ बसली व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तसेच गेले अडीच वर्षामध्ये स्थानिक भूमिपूत्र कर्ज घेऊन व्यवसायांमध्ये स्थिरस्थावर होत असताना, राजकीय आकसापोटी शासकीय यंत्रणेस वेठीस धरून, भूमिपूत्रांच्या व्यवसायावर व घरा-दारांवर नांगर फिरवण्याचे आदेश देताना, स्थानिक भूमिपूत्रांविषयीची तळमळ कुठे धूळ खायला गेली होती आमदार साहेब हे तुमच वागण बर नव्हं…!