रमजान ईद व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
सातारा : रमजान ईद व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देश पोलीस विभागाला दिले.
रमजान ईद व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा येथून व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलींद भारंबे, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग आशुतोष डुंबरे, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम प्रसन्ना, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. चेरींग दोरजे, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्यासह सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.
रमजान ईद व इतर सण राज्यात साजरे करण्यात येणार आहेत. कोणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्याच्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येईल. कोणीही समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन करुन नये. पोलीस विभाग कायदा व सुव्यवस्था राखण्यास खंबीर असून नागरिकांनी आपले सण शांततेत साजरे करुन पोलीस विभागाला सहकार्य करावे, असेही आवाहनही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी केले.